शिरो आणि पिठलं
शिरा नाही हो शिरो!
एका इथिओपियन रेस्टोरंटमधे पहिल्यांदा हा पदार्थ खाल्ला काही वर्षांपूर्वी घावनासारख्या इंजेराबरोबर तेव्हा चटकन् ट्टाॅक केलेलं. आपल्या काळ्या किंवा गरम मसाल्यासारखा वेगवेगळे घटक असलेला तिथला बर्बर मसाला घातल्यामुळं बरीच वेगळी चव असली तरी हा पदार्थ म्हणजे आपल्या पिठल्याचं हरवलेलंभावंडंच.
तसं तर इथिओपियाशी भारताचे सांस्कृतिक संबंध अगदी इसवीसनाच्या पहिल्या-दुसऱ्या शतकापासून आलेले दिसतात. तिथल्या बंदरांमध्ये भारतीय व्यापाऱ्यांची ये जा ही काही नवीन नाही. पण खाद्यसंस्कृतीतली साधर्म्य शोधतांना कधीकधी कुणी कुणाकडून काय शिकून एखादी पाककृती आपलीशी केली हे सांगणं कठीण असतं. त्यात भारत आणि इथिओपियाचे संबंध हे अरब संस्कृतीसारख्या एक दोन महत्त्वाच्या नि परिणामकारक दुव्यांना धरून जात असल्यानं तर निश्चितच पिठलं नि शिरोचा संबंध कसा होता हे कोडं अजून सोडवायचं आहे. पण थोडं शोधल्यावर काही साधर्म्य सापडली ती मांडते.
अम्हारिक ही इथियोपियाची सगळ्यात लोकप्रिय भाषा. त्यात शिरोचा शब्दश: अर्थ म्हणजे डाळीचं पीठ! हरभरा डाळीला शिम्बरा म्हणतात. शिरो हा शिम्बराचा अपभ्रंश असावा असं काहींचे मत. तर अहान ओरोमा ह्या तिथल्या दुसऱ्या लोकप्रिय भाषेतल्या ‘सूर’ म्हणजे पेज या शब्दावरून शिरो/शुरो/शेरो हे नाव मिळालं असा इतर काही अभ्यासकांचा अंदाज. ते नव्हे, मराठीतल्या शिरा ह्या शब्दाचा एक अर्थ सत्त्व/ पीठ असा देखील आहे, हे लक्षात घ्यायलाच हवं इथे.
तर पिवळ्या वाटाण्यापासून, फावा बीन्स, ते अगदी आत्ता वापर वाढलेल्या चणाडाळीच्या तयार पीठाला शिरो म्हणतात.आपल्याकडं जसं पिठल्याला नुस्तं पिठी ही म्हणतात तसं इथिओपियन रेस्टोरंटमधला पदार्थही शिरो म्हणूनच असला मेन्यूकार्डावर तरी त्याचं पारंपरिक नाव आहे शिरो वेट Shiro wet किंवा शिरो वाट म्हणजे सोच्छ मराठीत पीठ ओलं … पिठलं हो!
पिठलं-भाकरी जसं सर्वसाधारण मराठी माणसाचं मुख्य अन्न समजलं जातं तसंच इथियोपियातल्या सामान्य माणसांचं मुख्य अन्न शिरो-इंजेरोच होतं आत्तापावेतो. अगदी न्याहरीला झुणका-भाकर तसं तिथे हे breakfast food. आणि फारफार तर आपल्यात जशी तुपाची धार असते पिठल्यांत उच्च मध्यमवर्गीयांत तशीच तिथं वर्णनं आढळतात शिरोवर घेतलेल्या नाइतर किबह niter kibbeh म्हणजे इथिओपियन तुपाची नि त्या खमंग वासाची.
भारतात जशी वेगवेगळी पिठं वापरून केलं जातं पिठलं तसंच तिथेही वेगवेगळी पिठं वापरून केलं जातं शिरो. वेगवेगळ्या कारणांनी आता निकृष्ट ठरलेल्या grass beans, kesari dal(लाखी डाळ) पिठीपासूनही तिथे तयार करायचे शिरो पूर्वी. पण त्यापासून होणारे रोग लक्षात आल्यावर आता ते थांबलंय्. आपल्याकडे अगदी अात्तापर्यंत तयार बेसनात लाखी डाळीचं पीठ सर्रास भेसळलं जात होतं.
नुस्तं वेगवेगळी पिठच नाही तर घट्ट, पातळ, वेगवेगळी व्यंजनं, भाज्या घालून केले जाणारे शिरोचे प्रकारही आहेत. अगदी मांसाहारी शिरो देखील केलं जातं. ह्या सगळ्या प्रकारांची वेगवेगळी नावंही आहेत. आपल्याकडे असतं अळणी पिठलं नि रावण पिठलं तसं तिथे असतं नेच शिरो (netch shiro) नि काय शिरो (kay Shiro).
बरं आता पिठल्यालारखंच म्हटल्यावर कृतीही सारखीच असणार हे गृहीतच. अर्थातच फोडणी नाही पण तेलात कांदा, लसूण नि अगदी हव्या त्या भाज्या घालून परतायचं नि मग पाणी घालून त्याला उकळी येऊ द्यायची मग हळूहळू सोडायचं त्यात बर्बर मसाला घातलेलं शिरो पीठ. नि मग मंद आंचेवर शिजू द्यायचं. पिठलं नीट शिजवता आलं की तुम्ही सुगरण! असंच आहे तिथंही. माझी आजी म्हणायची चांगलं रटरट शिजू दे पिठलं. कुणी एक इथिओपियन ओगलेबाई लिहितात, टुक-टुक असा आवाज आला कि झालं शिरो नीट… शिरोला टुकटुकच म्हटलंय् त्यांनी तर!
अजूनही बरंच काही या शिरो-पिठलं पुराणात. पण सध्या इतकंच.